मुख्य सामग्रीवर वगळा

Social media वरील निवडक पोस्ट्स - प्रमाण

ही कृष्णाजी नारायण आठल्ये यांची "प्रमाण" नावाची कविता आहे.
आठवणीतील कविता यात ती वाचायला मिळतात. स्वातंत्र्यपूर्व काळात ती सर्वाची तोंडपाठ होती.
'केरळकोकीळ' ही त्यांना उपाधी होती.
'सासरची पाठवणी' ही त्यांची आणखी एक अजरामर कविता.
मराठी विश्वकोश, मराठी चरित्रकोश, आठल्ये घराण्याचा इतिहास यात अधिक माहिती उपलब्ध आहे.
जिज्ञासूंनी अवश्य पहावी.
अतिशय सुंदर रचना.

ही २० कडवी म्हणजे 
२० रत्ने आहेत...........

         

अतीकोपता कार्य जाते  लयाला, 
अती नम्रता पात्र होते भयाला ।
अती काम ते कोणतेही नसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १ ।।

अती लोभ आणी जना नित्य लाज,
अती त्याग तो रोकडा मृत्य आज ।
सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २ ।।

अती मोह हा दु:ख शोकास मूळ, 
अती काळजी टाकणे हेही खूळ ।
सदा चित्त हे सद्विचारे कसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ३ ।।

अती ज्ञान अभ्यासल्या क्षीण काया,
अती खेळणे हा भिकेचाच पाया ।
न कष्टाविणे त्वा रिकामे बसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ४ ।।

अती दान तेही प्रपंचात छिद्र, 
अती हीन कार्पण्य मोठे दरिद्र ।
बरे कोणते ते मनाला पुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ५ ।।

अती भोजने रोग येतो घराला, 
उपासे अती कष्ट होती नराला ।
फुका सांग देवावरी का रुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ६ ।।

अती स्नेह तेथे अवज्ञा उदंड, 
अती द्वेष भूलोकीचे पंककुंड ।
अती मत्सरे त्वां कशाला कुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ७ ।।

अती आळशी वाचुनी प्रेतरूप, 
अती झोप घे तोही त्याचाच भूप ।
सदा सत्कृतीमाजी आत्मा विसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ८ ।।

अती द्रव्यही जोडते पापरास, 
अती घोर दारिद्य्र तो पंकवास ।
धने वैभवे त्वां न केंव्हा फसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ९ ।।

अती भाषणे वीटती बुद्धिवंत, 
अती मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत ।
खरे तत्त्व ते अल्पशब्दे ठसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १० ।।

अती वाद घेता दुरावेल सत्य, 
अती `होस हो' बोलणे नीचकृत्य ।
विचारे तुवा ज्ञानमार्गी घुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ११ ।।

अती औषधे वाढवितात रोग, 
उपेक्षा अती आणते सर्व भोग ।
हिताच्या उपायास कां आळसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १२ ।।

अती दाट वस्तीत नाना उपाधी, 
अती शून्य रानात औदास्य बाधी ।
लघुग्राम पाहून तेथे वसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १३ ।।

अती शोक तो देतसे दुःखवृद्धी, 
अती मानतो हर्ष तो क्षूद्रबुद्धी ।
ललाटाक्षरां सांग कोणी पुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १४ ।।

अती भूषणे मार्ग तो संकटाचा, 
अती थाट तो वेष होतो नटाचा ।
रहावे असे की न कोणी हसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १५ ।।

स्तुतीला अती बोलती श्वानवृत्ती, 
अती लोकनिंदा करी दुष्ट चित्ती ।
न कोणा उगे शब्द स्पर्शे डसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १६ ।।

अती भांडणे नाश तो यादवांचा, 
हठाने अती वंश ना कौरवांचा ।
कराया अती हे न कोणी वसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १७ ।।

अती गोड खाणे नसे रोज इष्ट, 
कदन्ने अती सेवणे हे कनिष्ठ ।
असोनी गहू व्यर्थ खावे न सावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १८ ।।

जुन्याचे अती भक्त ते हट्टवादी, 
नव्याचे अती लाडके शुद्ध नादी ।
खरे सार शोधोनिया नित्य घ्यावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १९ ।।

सदा पद्य घोकोनियां शीण येतो, 
सदा गद्य वाचोनियां त्रास होतो ।
कधी ते कधी हेही वाचीत जावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २० ।।

टिप्पण्या