"अरे, तुझ्याकडे पन्नास रुपये असतील का? उद्या सकाळी देतो."रोहनने हे विचारताना आवाजात सहजपणा आणण्याचा प्रयत्न केला. पण ती नोट हातात पडली तेव्हा आतमध्ये कुठेतरी काहीतरी टोचलं.
पन्नास रुपये...
आज महिन्याचा फक्त बावीसावा दिवस होता. पगार यायला अजून आठ दिवस बाकी होते. बँक अकाउंट जवळपास रिकामं होतं. UPI उघडून बॅलन्स पाहायचीसुद्धा त्याची हिंमत होत नव्हती.
संध्याकाळी तो घरी आला. बूट काढले. बॅग एका कोपऱ्यात फेकली आणि शांतपणे सोफ्यावर बसला.
घरात सगळं होतं...
मोठा टीव्ही...
महागडा मोबाईल...
EMI वर घेतलेलं फर्निचर...
ब्रँडेड शूज...
महागडं घड्याळ...
पण मनात मात्र एकच प्रश्न फिरत होता.
"मी नेमकं कमावतो तरी कुणासाठी?"
काही वर्षांपूर्वीचं आयुष्य त्याच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. तेव्हा तो एका छोट्याशा कंपनीत काम करायचा. महिन्याचा पगार फक्त १२,००० रुपये. घरभाडं... प्रवास... घरखर्च... सगळं करूनही महिन्याच्या शेवटी दोन-तीन हजार रुपये वाचायचे. कधी पाच हजार झाले तर तो स्वतःला श्रीमंत समजायचा.
त्याच्या कपाटात एक छोटासा डबा होता. त्या डब्यात तो दर महिन्याला थोडेथोडे पैसे ठेवायचा. नोटा मोजताना त्याच्या चेहऱ्यावर जी समाधानाची भावना असायची, ती आज लाख रुपये पगार असूनही नव्हती.
त्यावेळी त्याला प्रत्येक रुपयाची किंमत माहीत होती. चहा बाहेर पिण्याऐवजी ऑफिसच्या मशीनवरचा चहा चालायचा. बसने जाता येत असेल तर ऑटोचा प्रश्नच नव्हता. मोबाईल खराब झाला तर दुरुस्त करायचा. नवीन घेण्याचा विचारही करायचा नाही. कपडे फाटले तर शिवून वापरायचे.
"गरज" आणि "हौस" यातला फरक त्याला स्पष्ट कळायचा.
मग आयुष्य बदलायला लागलं. पहिली नोकरी बदलली. पगार झाला वीस हजार. काही महिन्यांनी तीस. नंतर चाळीस. पन्नास. सत्तर. शेवटी लाखाच्या आसपास.
प्रत्येक वेळी त्याला वाटायचं... "आता मात्र पैसे नक्की साठतील."
पण विचित्र गोष्ट अशी होती... पगार वाढला तसं खर्चही वाढत गेला.
पहिल्या पगारवाढीनंतर त्याने स्वतःला म्हटलं, "इतकी मेहनत करतो. एक चांगला मोबाईल घ्यायलाच हवा." मोबाईल घेतला. काही महिन्यांनी... "मोठा टीव्ही हवा." मग... "फ्रिज बदलू." "सोफा जुना दिसतो." "वीकेंडला बाहेर जेवायलाच पाहिजे." "सुट्टी आहे म्हणजे ट्रिप झालीच पाहिजे."
पूर्वी महिन्यातून एकदा बाहेर जेवण व्हायचं. आता आठवड्यातून दोनदा. पूर्वी पाचशे रुपये खर्च करताना विचार व्हायचा. आता पाच हजार रुपये कार्डवर स्वाइप करताना हातही थांबत नव्हता.
"EMI आहे ना..." ही चार अक्षरं त्याच्या आयुष्याचा भाग झाली.
सुरुवातीला EMI एक होती. नंतर दोन. मग तीन. मोबाईलची. टीव्हीची. फर्निचरची. क्रेडिट कार्डचं बिल. त्यात ऑनलाइन सेल. "Limited Time Offer" "Only Today" "Buy Now" — या शब्दांनी त्याचं पाकीट नकळत रिकामं करायला सुरुवात केली.
सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे... हे सगळं त्याला चुकीचं वाटतच नव्हतं. कारण त्याच्या आजूबाजूचे सगळे लोक तसंच करत होते.
ऑफिसमध्ये कुणी नवीन फोन घेतला की त्यालाही स्वतःचा फोन जुना वाटायचा. कुणी परदेशात फिरून आलं की त्यालाही ट्रिप प्लॅन करावीशी वाटायची. कुणी नवीन गाडी घेतली की त्याचं मन अस्वस्थ व्हायचं. त्याच्याकडे नसलेली प्रत्येक गोष्ट त्याला आवश्यक वाटू लागली.
एका रविवारी तो कपाट साफ करत होता. एका जुन्या फाईलमधून एक छोटी वही खाली पडली. धूळ झटकून त्याने ती उघडली. पहिल्या पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं... "बचत वही."
त्याला आठवलं... ही वही त्याने पहिल्या नोकरीत लिहायला सुरुवात केली होती. त्यात प्रत्येक महिन्याची नोंद होती.
पगार - १२,०००
खर्च - ९,४५०
बचत - २,५५०
पुढच्या महिन्यात... बचत - ३,१०० मग... २,८०० — ३,४५० — ४,०००...
तो शांतपणे पानं उलटवत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं... फक्त आश्चर्य होतं.
त्याने लगेच मोबाईल काढला. सध्याच्या बँक खात्याचा स्टेटमेंट उघडलं.
महिन्याचा पगार... पूर्वीच्या चार-पाच पट. पण महिनाअखेरची बचत? शून्य.
काही महिन्यांत तर बचतीऐवजी क्रेडिट कार्डचं बाकीचं बिल जास्त होतं.
तो काही मिनिटं नुसताच स्क्रीनकडे पाहत राहिला. मग त्याने स्वतःलाच एक प्रश्न विचारला...
"जेव्हा माझ्याकडे कमी पैसे होते, तेव्हा मी पैसे साठवत होतो... आज इतके जास्त पैसे असूनही माझ्या हातात काहीच का राहत नाही?"
त्या रात्री त्याला झोप लागली नाही.
काय झालं रोहनची गोष्ट तुम्हाला स्वतःची वाटतेय होना? तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न पडतो की आपला पैसा नेमका जातोय कुठे... आणि आपण आपल्या future planning चं काय करणार?
आपल्यापैकी किती जणांचं आयुष्य हल्ली तीन भागात वेगळं करू शकतो.. पगार आल्यावरचे दहा दिवस म्हणजे आम्ही श्रीमंत, पैसा हीच पैसा आहे आपल्यापाशी. दुसरे दहा दिवस म्हणजे आम्ही middle class, खर्च भागतोय पण पुढे कसं होणार? पण यार आपली lifestyle upgrade करणं तर गरजेचंच आहे नाही का... आणि शेवटचे दहा दिवस? ते आपण रोहनच्या गोष्टीत पाहतोच आहोत. त्याची आणि आपली गोष्ट काही वेगळी नाहीये, बरोबर ना? पण चला बघूयात रोहन यातून कसा बाहेर पडतो आणि त्यानंतर रोहनने या परिस्थितीतून म्हणजे मी म्हणेन की मन:स्थितीतून बाहेर पडण्यासाठी काय केलं आणि आपण काय करू शकतो यावर सविस्तर विचार करूया.
आयुष्यात पहिल्यांदाच त्याने स्वतःच्या पगाराकडे नाही... तर स्वतःच्या सवयींकडे पाहायला सुरुवात केली. त्याच्या डोक्यात एकाच प्रश्नाचा आवाज घुमत होता... "समस्या माझ्या पगारात नाही... मग नक्की आहे कुठे?"
त्या रात्री त्याने मोबाईल बाजूला ठेवला. टीव्ही सुरू केला नाही. काहीही न करता तो फक्त शांत बसून राहिला. खूप दिवसांनी तो स्वतःशी बोलत होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जाताना त्याने एक वेगळंच काम केलं. चहा घेतला. पण नेहमीप्रमाणे मोबाईलवर रील्स पाहत बसला नाही. तो फक्त लोकांकडे बघत राहिला.
कोणी घाईघाईने ऑफिसकडे धावत होतं... कोणी फोनवर मोठ्या आवाजात बोलत होतं... कोणी ऑनलाइन शॉपिंगचं पार्सल घेऊन जात होतं...
अचानक त्याला जाणवलं... सगळे धावत आहेत... पण कुठे?
आणि तो स्वतः? तोसुद्धा मागची अनेक वर्षं फक्त धावत होता. जास्त पगारासाठी... मोठ्या घरासाठी... चांगल्या मोबाईलसाठी... पण एकदाही थांबून त्याने विचारच केला नव्हता... "मला खरंच किती लागतं?"
त्या दिवशी ऑफिसमधून घरी आल्यावर त्याने एक वही काढली. तीच जुनी बचतीची वही नव्हती. नवीन होती. पहिल्या पानावर त्याने लिहिलं... "माझे पैसे कुठे जातात?"
बस. फक्त एवढंच.
कोणतंही मोठं Budget Planner नाही. कोणतंही Financial App नाही. कोणतीही अवघड Excel Sheet नाही. फक्त एक साधी वही.
दुसऱ्या दिवसापासून त्याने एक नियम केला. एकही रुपया खर्च झाला की लिहायचा.
सकाळचा चहा – २० रुपये.
बिस्कीट – ३०.
ऑटो – १५०.
कॉफी – १८०.
ऑनलाइन स्नॅक्स – २९९.
रात्री आईस्क्रीम – २५०.
सुरुवातीला त्याला हे खूप कंटाळवाणं वाटलं. "अरे एवढं कोण लिहित बसतं?" असं त्यालाही वाटलं. पण त्याने स्वतःला सांगितलं... "फक्त तीस दिवस."
महिना संपला. तो वही घेऊन बसला. एक-एक खर्च जमा करायला लागला. आणि त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.
महिनाभरात... फक्त बाहेरचा चहा आणि कॉफी... ३,८५० रुपये. ऑनलाइन फूड... ६,७०० रुपये. अचानक केलेली ऑनलाइन खरेदी... ११,००० रुपये. त्यातल्या निम्म्या वस्तू अजून बॉक्समधूनही बाहेर आल्या नव्हत्या.
त्याने कपाट उघडलं. एक शर्ट... दुसरा शर्ट... तिसरा... दहावा... पंधरावा... त्याला आठवतही नव्हतं, यापैकी किती शर्ट त्याने घातले होते. काहींवर अजून Price Tag लटकत होतं.
एका ड्रॉवरमध्ये तीन Power Bank. चार Earphones. दोन Smart Watches. एक जुना Tablet.
सगळं होतं. पण वापर किती? कदाचित दहा टक्के.
त्या रात्री त्याने एक महत्त्वाची गोष्ट लिहून ठेवली. "मी गरजेच्या वस्तू विकत घेत नाही... मी भावना विकत घेतो."
नवीन मोबाईल घेतल्यावर दोन दिवस आनंद. नवीन शूज घेतल्यावर एक आठवडा उत्साह. नवीन घड्याळ घेतल्यावर ऑफिसमध्ये दोन लोकांनी विचारलं... "वा! नवीन आहे का?" बस. तेवढाच आनंद. मग पुन्हा मन रिकामं. पुन्हा काहीतरी नवीन हवं.
त्याला अचानक एक गोष्ट आठवली. लहानपणी त्याचे बाबा पगाराच्या दिवशी घरी यायचे. संपूर्ण पगार आईच्या हातात द्यायचे. आई तो पगार चार भागात विभागायची.
घरखर्च. वीज. शाळा. बचत.
आणि गंमत म्हणजे... बचतीचे पैसे आधी बाजूला जायचे. जे उरेल त्यातून घर चालायचं.
आज तो उलट करत होता. आधी सगळा खर्च. महिन्याच्या शेवटी काही उरलं तर बचत. आणि अर्थातच... कधीच काही उरत नव्हतं.
त्या दिवशी त्याने एक निर्णय घेतला. पुढच्या पगारापासून बचत शेवटी नाही... सुरुवातीला करायची.
महिन्याच्या पहिल्याच दिवशी त्याने बँकेत Standing Instruction लावली. पगार जमा झाला... आणि त्याच क्षणी काही रक्कम दुसऱ्या खात्यात गेली.
ते खाते त्याने मुद्दाम वेगळ्या बँकेत उघडलं होतं. ATM कार्ड नाही. UPI नाही. नेटबँकिंग लॉगिनही मोबाईलमध्ये सेव्ह केलं नाही.
कारण त्याला माहिती होतं... समस्या पैशांची नाही... स्वतःच्या कमकुवतपणाची आहे.
पहिला महिना... कठीण गेला. दुसरा... थोडा कमी. तिसऱ्या महिन्यात एकदा त्याचा मित्र म्हणाला... "चल ना... नवीन फोन Launch झालाय."
पूर्वीचा रोहन असता... तर दुसऱ्या दिवशी फोन बुक झाला असता.
पण यावेळी तो फक्त हसला. म्हणाला... "माझा फोन अजून व्यवस्थित चालतोय."
मित्र हसला. "अरे, एवढा कंजूस कधीपासून झालास?"
रोहनही हसला. पण मनात म्हणाला... "कंजूस नाही... शहाणा होतोय."
हळूहळू त्याच्या सवयी बदलायला लागल्या. ऑनलाइन शॉपिंग करण्याआधी तो एक नियम पाळू लागला. कार्टमध्ये वस्तू Add करायची. पण लगेच Buy नाही. सात दिवस थांबायचं. जर सात दिवसांनीही ती वस्तू तितकीच आवश्यक वाटली... तरच विकत घ्यायची.
आश्चर्य म्हणजे... दहा पैकी आठ वस्तू तो सात दिवसांनी स्वतःच Delete करायचा. कारण ती गरज नव्हती. तो फक्त त्या क्षणाचा मोह होता.
त्याने अजून एक छोटासा नियम केला. काहीही खरेदी करण्यापूर्वी स्वतःला तीन प्रश्न विचारायचे.
मला याची खरंच गरज आहे का?
माझ्याकडे यासारखी वस्तू आधीपासून आहे का?
आज घेतली नाही तर माझं काही अडणार आहे का?
जर तिन्ही प्रश्नांची उत्तरं स्पष्ट मिळाली... तरच पैसे खर्च करायचे.
हे नियम ऐकायला खूप छोटे वाटतात. पण काही महिन्यांनी त्याचा परिणाम दिसायला लागला. महिनाअखेरीस बँक अकाउंट रिकामं राहत नव्हतं. क्रेडिट कार्डचं बिल वेळेवर भरलं जायचं.
आणि अनेक वर्षांनी... त्याने पुन्हा एकदा आपल्या बचतीच्या खात्याचा बॅलन्स पाहिला.
रक्कम फार मोठी नव्हती. पण त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान होतं... ते लाखाचा पगार मिळालेल्या दिवशीही नव्हतं.
कारण यावेळी त्याला एक गोष्ट समजली होती... श्रीमंती म्हणजे किती कमावतो हे नाही... श्रीमंती म्हणजे किती स्वतःजवळ ठेवू शकतो, आणि त्यासाठी स्वतःच्या इच्छांवर किती नियंत्रण ठेवू शकतो.
त्या दिवशी त्याने वहीच्या शेवटच्या पानावर एक वाक्य लिहिलं... "पगार वाढल्याने आयुष्य बदलत नाही... सवयी बदलल्याने बदलतं."
आणि त्या दिवसानंतर... त्याने पैसे कमावणं थांबवलं नाही. पण पैशांना थांबायला शिकवलं.
तर आलं का काही लक्षात? हरकत नाही आत्तापर्यंत जे झालं ते झालं पण यापुढे तरी असं व्हायला नको म्हणून आधी आपण रोहनने नेमकं काय केलं आणि ते पण आपल्या जीवनात कसं आणू शकतो यावर विचार करूयात.
परिस्थितीचा स्वीकार: जेव्हा रोहनला लक्षात आलं की आपल्यासोबत काय होतंय तेव्हा त्याने कोण्या व्यक्तीला दोष दिला नाही, आणि मुख्य म्हणजे त्याने स्वतःला दोष दिला नाही. त्याने फक्त परिस्थितीचा स्वीकार केला. आपणही तेच केलं पाहिजे. माझा पगार वाढत नाही, माझ्या गरजा जास्त आहेत किंवा आणखी काही वेगळं कारण शोधण्याची किंवा पळवाट काढायची गरज नाही. फक्त जी परिस्थिती आहे ती स्वीकारणं गरजेचं आहे.
स्वतःच्या आयुष्याचं आणि खर्चाचं निरीक्षण: रोहनने परिस्थिती लक्षात आल्यावर लगेच घाईघाई action नाही घेतले. की मी उद्याच एवढे रुपये बाजूला काढतो, हे खर्च कमी करतो, मी हे करतो ते करतो म्हणजे माझा खर्च कमी होईल असं नाही. त्याने आधी स्वतःचा खर्च नेमका कुठे होतो, कशासाठी होतो हे track केलं. त्यासाठी त्याने वही आणि पेनाची मदत घेतली. आणि मी ही तुम्हाला तेच सांगेन — आज कितीतरी budget apps उपलब्ध आहेत पण तरीही एक छोटी diary करा आणि त्यात फक्त खर्च लिहा. ज्यामुळे तुम्हाला track करायला सोपं पडेल की तुम्ही किती आणि कुठे खर्च करता. आणि मुख्य म्हणजे खर्च कितीही लहान असेल भलेही तुम्ही दहा रुपये खर्च केले तरी लिहा — कोणताही खर्च किरकोळ आहे म्हणून सोडून देऊ नका.
खर्चाचं विभाजन: जे खर्च तुम्ही लिहिलेले आहेत त्यांचं तीन भागात विभाजन करा — गरज, इच्छा, हौस. सर्वात आधी आपण गरज, इच्छा आणि हौस यातला फरक समजू. गरज यात ते खर्च येतील जसे की किराणा मालाची खरेदी, घरभाडे किंवा वीज बिल. इच्छा — रोजच्या येण्याजाण्याचा, चहा नाश्त्याचा खर्च इत्यादी. आणि हौस म्हणजे ज्या गोष्टी या दोन्हींमध्ये येणार नाहीत त्या सर्व खर्च. उदाहरणार्थ जसे नवीन mobile आला, तुमचा mobile व्यवस्थित आहे तरीही नवीन आला आहे आपल्याकडे असला पाहिजे वगैरे असे जे खर्च आहेत, जे तुम्ही स्वतःपेक्षा इतरांना दाखवायला किंवा त्यांच्याकडून स्वतःची वाहवा करून घेण्यासाठी खर्च करता ते सगळे खर्च यात येतील. मला असं म्हणायचं नाहीये की आपण मजा मस्ती, हौस मौज किंवा मनोरंजनावर खर्च करू नये. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे — आधी गरजा पूर्ण करा. असं व्हायला नको की हौस मौज करण्यात सगळा पैसा घालवला आणि गरजेच्या गोष्टींसाठी उधारी करावी लागते.
नियमांचं पालन करा: हौस आणि अतिरिक्त इच्छेसाठी खर्च करण्याआधी रोहनप्रमाणे तुम्ही सुद्धा तीन नियम लावू शकता — मला याची खरंच गरज आहे का? माझ्याकडे यासारखी वस्तू आधीपासून आहे का? आज घेतली नाही तर माझं काही अडणार आहे का?
Budget बनवा: हा एक असा मुद्दा आहे ज्याबद्दल आपण शाळेपासून अगदी व्यावहारिक आयुष्यापर्यंत सगळीकडे ऐकतो. पण प्रत्यक्षात आपण budget किती महत्त्वाचे असते या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. आणि त्या budget मध्ये गरज भागवण्यासोबत थोडासा हिस्सा हौस मौजेसाठी सुद्धा राखीव ठेवला पाहिजे.
आधी आपण सवय बनवतो आणि नंतर त्या सवयी आपल्याला बनवतात. पण कोणतीही सवय आपण बदलू शकतो हा स्वतःवर विश्वास असावा. आणि पैसे कमावणे किंवा खर्च करणे ही सुद्धा एक सवयच आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा